कै.शंकररावजी काळे साहेब यांचा जन्म ६ एप्रिल १९२१ रोजी माहेगाव देशमुख, तालुका- कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर, येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांची बुद्धिमता ओळखून त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाची संधी दिली आणि या संधीचा फायदा घेऊन त्यांनी बी.एस्सी, बी.ई. (सिव्हील) ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी २ वर्षे सरकारी नोकरी केली. पण नोकरीत मन रमेना. लोकांच्या हितासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून ते नोकरी सोडून गावी आले व आपले जीवन समाजकार्याला अर्पण केले. सर्वप्रथम त्यांनी १९५३ मध्ये माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना केली आणि आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली.
स्वर्गीय काळे साहेबांनी काही वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे काम केले. नंतर स्वामी सहजानंद भारती यांच्या प्रेरणेने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची धुरा सांभाळली. १९७२ ते १९८० दरम्यान त्यांनी नगर जिल्हा कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्षपद भुषवले. १ मे १९६२ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेची स्थापना झाली, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातील मंजूर जिल्हा परिषद गटातून निवडून येत स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मिळवला. नेतृत्वगुणांचा, संघटन कौशल्याचा, लोकहितवादी दृष्टीकोनाचा, ग्रामोद्धाराच्या तळमळीचा सुरेख मिलाफ साधत अल्पावधीतच जिल्हा परिषदेला स्वत:चा चेहरा प्राप्त करून दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून स्वत:ची ओळख सार्थ ठरवत त्यांनी शासनाच्या विविध विकास योजना ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. कोपरगाव सहकारी साखर कारखाना या आशिया खंडातील सहकारी तत्वावरील दुस-या सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. या कारखान्याचे संस्थापक संचालक व अध्यक्ष म्हणून त्यांनी शेवटपर्यंत धुरा सांभाळली.
कारखान्याच्या सहकार्याने त्यांनी गौतम एज्युकेशन सोसायटी, गौतम सहकारी बँक, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी, गौतम सहकारी कुक्कुटपालन, कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटी यासारख्या नामवंत संस्थांची उभारणी केली. सन १९७२ ते १९७८ पारनेर विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले. याच काळात १९७८ साली शिक्षण व सहकार खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. रयत शिक्षण संस्थेचे सलग १५ वर्षे चेअरमनपद त्यांनी भूषवले. सन १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कोपरगाव मतदार संघातून विजयी झाले. नॅशनल कोऑपरेटीव्ह डेव्हलपमेंट कौन्सिल, ऑल इंडिया डिस्टीलरी असोसिएशन, ग्रामविकास समिती अशा विविध देशपातळीवरील संस्थांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक पद त्यांनी भूषवले. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती पाण्याअभावी संपुष्टात येत असताना महाराष्ट्र शासनाचे पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 'अंतरलेले पाणी' हे पुस्तक लिहीले. त्यांना 'उद्योगरत्न', पुणे विद्यापीठाने 'जीवन गौरव' पुरस्कार देऊन गौरवले व रयत शिक्षण संस्थेने 'रयत माउली' सहकार प्रबोधनकार, गुलाबराव पाटील पुरस्कार, नाशिक येथील 'गिरनार गौरव' प्रतिष्ठानतर्फेही त्यांना सन्मानित करण्यात आले.
Created with
Website Building Software